Type Here to Get Search Results !

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी वेळापत्रक लागू झाले आहे

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी वेळापत्रक लागू झाले आहे. 

नवप्रभात NEWS / मुंबई 

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून उन्हाळी वेळापत्रक लागू झाले आहे. पावसाळ्यात कमी झालेला गाड्यांच्या वेगात आता वाढ होणार आहे.
 उन्हाळी वेळापत्रकानुसार स्थानकावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांच्या वेळांमध्ये एक ते दोन तासांचा बदल होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेचे वेळापत्रक पावसाळी व उन्हाळी अश दोन टप्प्यात चालवले जाते. पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर ते ९ जून हा उन्हाळी हंगामातील वेळापत्रक लागू केले जाते. तर पावसाळी हंगामासाठी गाड्यांचा वेग कमी केला जातो व १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये गाड्यांचा वेग निश्चित केला जातो. उन्हाळी वेळपत्रकानुसार गाड्यांचा वेग ताशी १३० ते १६० किमी राहील. यामुळे या मार्गावर वेगवान गतीने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या ७ तास ४५ मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. तर तेजस एक्सप्रेस ९ तास १० मिनिटांमध्ये मडगावला पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस ही ९ तास २० मिनिटामध्ये मुंबईहून मडगावला पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.
कोकण कन्या एक्सप्रेस मडगाव येथून सायंकाळी ७.०० सुटून सावंतवाडीला ८.३८ वाजता, कुडाळ ९.००, सिंधुदुर्गनगरी ९.१४, कणकवली ९.३० आणि वैभववाडीला ९.५६ वाजता सुटून मुंबई सीएसटीला पहाटे ५.४० वाजता पोहोचणार आहे. जनशताब्दी एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी ३.०५ वाजता सुटून सावंतवाडीला दुपारी ४.२४, कुडाळ ४.४२, कणकवली ५.०४ वाजता येणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस मडगाव येथून दुपारी २.४० वाजात सुटून कणकवली सायंकाळी ४.२० वाजता येणार आहे. मांडवी एक्सप्रेस मडगाव येथून सकाळी ९.१५ वाजता सुटून सावंतवाडीला १०.४२, कुडाळ ११.४, सिंधुदुर्ग नगरी ११.१७ कणकवली ११.३२ तर वैभववाडीला ११.५८ येणार आहे.
दिवाळीच्या सुट्टीत पर्यटक मोठ्या संख्येने कोकणासह गोव्याला येतात. यात देशी पर्यटकांची संख्या जास्त असते. आता दिवाळी झाल्यावर रेल्वेच्या प्रवाशांची संख्याही मोठी असेल तर डिसेंबर महिन्यात नाताळची सुट्टी येईल, मग कोकणासह गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे कोकण रेल्वेचे बदललेल्या वेळापत्रकाची माहिती घेऊन प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments