उमेदवारांसाठी दैनंदिन खर्चाचा हिशोब तपासण्याच्या तारखा जाहीर
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा विडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा दैनदिन खर्चाचा हिशेब प्रचार कालावधी मध्ये किमान 3 वेळा निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले खर्च निरीक्षक यांच्याकडून तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा खर्च सनियंत्रण समिती समन्वय अधिकारी अमित मेश्राम यांनी दिली आहे.
या वेळापत्रकानुसार तिन्ही मतदारसंघातील सर्व उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी दिनांक 9 नोव्हेंबर 2024, व्दितीय तपासणी दिनांक 13 नोव्हेंबर व तृतीय तपासणी दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या तीन्ही तपासण्या जिल्हा नियोजन समिती सभागृह (नविन) जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदशक सूचनांनुसार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांना खर्च करण्याची मर्यादा 40 लाख असून या तपासणीत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाने आखून दिलेल्या विहित नियमानुसार व मर्यादेत खर्च करीत आहेत किंवा कसे? याची खातरजमा निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिव्या के.जे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा खर्च सनियंत्रण समितीकडून केली जाणार आहे. वरील नमूद वेळापत्रकाप्रमाणे उमेदवार, उमेदवारांचे खर्च प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख निवडणूक खर्च निरीक्षक यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन न दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील कलम 78 अन्वये उमेदवाराने खर्चाचे दैनंदिन अभिलेख अद्यावत ठेवले नसल्याचे समजण्यात येऊन उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून नोटीस बजावल्या जातील. जो उमेदवार निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च करेल त्याला अपात्र करण्यातबाबत देखील निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आहेत. उपरोक्त खर्च तपासणीच्या तारखांना स्वत: उमेदवारांनी किंवा त्यांच्या खर्च प्रतिनिधींनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
Post a Comment
0 Comments