Type Here to Get Search Results !

आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांच्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचे दि.०७ व ०८ डिसेंबरला आयोजन

आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांच्या वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक चौथ्या मराठी साहित्य संमेलनाचे दि.०७ व ०८ डिसेंबरला आयोजन 

  योगेश तांडेल 
नवप्रभात NEWS 

           निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेल्या वेंगुर्ल्याच्या भूमीला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. या तेजस्वी वारशाची ओळख  पुढील पिढीला व्हावी यासाठी आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला हे गेली पंचवीस वर्षे सतत सातत्याने विविध साहित्यिक उपक्रम राबवत आहे. वेंगुर्ल्यात  त्रैवार्षिक साहित्य संमेलनाची प्रथा सुरू करून मंडळाने सांस्कृतिक  क्षेत्रात एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. नवोदिताना व्यासपीठ मिळावे, मार्गदर्शन मिळावे, प्रोत्साहन मिळावे याचबरोबर जिल्ह्यातील वाचक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, अभ्यासक इत्यादी साहित्यातील सर्व घटकांनी एक दिवस एकत्र यावे,परस्पर स्नेह वृद्धिंगत व्हावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी, उत्साहपूर्ण  वातावरणात, वाङ्मयीन विविध घटकांचा कलात्मक आनंद सर्वानी घ्यावा आणि यातून उर्जा घेऊन नव-नवीन कलाकृतींची निर्मिती व्हावी.असे अनेक उद्देश समोर ठेवून आनंदयात्री वाङ्मय मंडळ दर तीन वर्षानी साहित्य संमेलनाचे आयोजन करत असते.
      मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला नवसंजीवनी देणारे हे साहित्य संमेलन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक, साहित्य प्रेमी आणि वाचक यांच्यातील संवादात्मक विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी एक महत्वपूर्ण मंच ठरणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून स्थानिक तसेच राज्यस्तरीय साहित्यिक, कवी, लेखक आणि विचारवंत एकत्र येऊन मराठी साहित्याच्या विविध अंगांचा अभ्यास, समीक्षा आणि विकास यावर मंथन करणार आहेत.
     साहित्याच्या या महोत्सवात वाचन, लेखन,प्रतियोगिता आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामुळे नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळेल आणि साहित्यिक विश्वातील नव्या विचारांची उभारणी होईल. वेंगुर्ला तालुका, आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेले क्षेत्र आहेच आता मराठी साहित्याच्या क्षेत्रातही एक महत्त्वपूर्ण केंद्र बनत आहे.
      या संमेलनाचा उद्देश मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारात योगदान देणे, साहित्याची विविध शास्त्रशुद्ध गाभ्यांवर चर्चा करणे, तसेच या क्षेत्रातील युवा प्रतिभांना समोर आणणे हा  आहे.
        आनंदयात्री वाङ्मय मंडळ  वेंगुर्ला यांचे वेंगुर्ला तालुका त्रैवार्षिक  चौथे मराठी साहित्य संमेलन दि.०७ व ०८  डिसेंबर २०२४ रोजी आयोजित केले आहे. सदर संमेलनसाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले, किरात ट्रस्ट, को.म.सा.प. सिंधुदुर्ग जिल्हा शाखा या सहयोगी संस्था आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.माधुरी शानभाग या आहेत. प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. पि.के.पाटील निवृत्त प्राचार्य गोखले कॉलेज व सुप्रसिद्ध वक्ते हे असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष  विजू गावडे, प्रशासकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिका हे आहेत.
      ०७ डिसेंबर रोजी ग्रंथ दिंडीने संमेलनाची सुरूवात होईल. ग्रंथदिंडी चे उद्घाटक प्रसिद्ध उद्योजक  सचिन वालावलकर  हे असतील. प्रमुख पाहुण्या उद्योजक सीमा नाईक असतील. ग्रंथदिंडी बॅ. बाळासाहेब खर्डेकर काॅलेज कडून निघून हाॅस्पिटल नाका, बाजारपेठ , दाभोली नाका मार्गे संमेलन स्थळी पोहोचेल. ग्रंथदिंडी मध्ये तुळस हायस्कूलचे झांज पथक, ढोल-तासे पथक, मठ हायस्कूलचे लेझिम पथक, चित्ररथ, वारकरी भजन व पारंपारिक वेशभूषेतील स्त्री पुरूष असतील. अशाप्रकारे भव्य ग्रंथदिंडी असेल. ग्रंथदिंडी संमेलन स्थळी जयवंत दळवी नगरी साई मंगल कार्यालय येथे पोहोचली की विसर्जित  होईल. तेथे रांगोळी प्रदर्शन, साहित्यिकांच्या हस्ताक्षरांचे प्रदर्शन,पुस्तक स्टाॅल्स यांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होईल.प्रकाशन क्षेत्रातील विशेष नावलौकिक प्राप्त राजहंस प्रकाशनच्या  पुस्तकांचे प्रदर्शन व विक्री असेल.  
     सभागृहात दिवंगत साहित्यिकांच्या माहितीचे बोर्ड लावलेले असतील.
      दिनांक ०८  डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष मा.प्रा. माधुरी शानभाग, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.पि. के. पाटील, स्वागताध्यक्ष विजू गावडे , पारितोषिक कंकाळ           वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, भाई मंत्री सुप्रसिद्ध उद्योजक, प्रा.डॉ.एम. बी.चौगले प्राचार्य बॅ. खर्डेकर काॅलेज, मंगेश मसके अध्यक्ष  कोमसाप सिंधुदुर्ग जिल्हा . इत्यादी मान्यवर उपस्थित असतील. या कार्यक्रमात कै. पार्वती रामचंद्र रायकर स्मृती कादंबरी पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल तसेच आनंदयात्रीकडून दिल्या जाणाऱ्या आनंदयात्री साहित्य गौरव पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होईल.यामध्ये सत्कारमूर्ती म्हणून  शिक्षण व साहित्य या दोन क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना सन्मानित केले जाईल. त्यात रामचंद्र आंगणे, भरत गावडे, विठ्ठल कदम, सरिता पवार, डाॅ. दिपाली काजरेकर, नारायण गिरप, पांडुरंग कौलापुरे, वाचकांचे प्रतिनिधी म्हणून संजीवनी बांबूळकर, अवधूत नाईक व लक्षवेधी लेखक पुरस्कार प्रदीप केळुसकर इत्यादी असतील. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनानंतर उद्घाटन सत्राचा समारोप होईल. त्यानंतर
' मराठीची बोलू कौतुके ' हा मराठी साहित्य व मराठी लोकसंस्कृती यांचे दर्शन घडविणारा आनंदयात्रीं चा सहभाग असलेला विशेष कार्यक्रम होईल.यामध्येच गोव्यातील शलती काळे यानी संगीतबद्ध केलेल्या समूहगीताचे सादरीकरण होईल. दुपारी १.३०  ते ३.००  या वेळेत भोजन व परस्पर ओळख होईल. दुपारी ३.०० ते ३.३० या वेळेत जयवंत दळवी लिखित संध्याछाया या नाटकातील एक प्रवेश नाट्य अभिनेते श्याम नाडकर्णी व कवयित्री सई लळीत हे  साभिनय वाचनातून सादर करतील. दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत कवी  ॲड.विलास कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली  निमंत्रितांचे कवी संमेलन होईल. या कवी संमेलनात निमंत्रित कवी म्हणून शशिकांत तिरोडकर (मुंबई), प्रिया मयेकर (ठाणे), डाॅ. अनुजा जोशी (गोवा), डाॅ. माधुरी जोशी (देवगड), डाॅ. दर्शना कोलते (कसाल), योगीश कुलकर्णी (सावंतवाडी), प्रा. मोहन कुंभार  (राजापूर) स्नेहा कदम ( सावंतवाडी) ही नव्या पिढीची प्रतिनिधी म्हणून असेल. या कवी संमेलनासाठी विविध भागातील विविध  काव्य प्रवाहांचे प्रतिनिधित्व करणारे कवी व कवयित्री उपस्थित  असतील. त्यामुळे सांप्रत काळातील नाविन्यपूर्ण व वैविध्यपूर्ण  अशा काव्याचा आस्वाद काव्य रसिकांना मिळू शकेल. सायं. ४.३० ते ५.३० या वेळेत  संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम होईल. यावेळी विविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरण होईल. मराठी भाषेविषयी काही ठराव घेतले जातील. कार्यकर्त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होईल. अध्यक्षीय मनोगतानंतर ऋणनिर्देशाने समारोप होईल.
अशी माहिती वृंदा कांबळी यांनी दिली यावेळी प्रा. आनंद बांदेकर, पि.के कुबल, प्रा.सचिन परुळकर, महेश राऊळ,सागर सावंत, आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments