बारावीची ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर
नवप्रभात NEWS / पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर होणार आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीचे २१ फेब्रुवारी सुरू होणार आहे.
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले होते. या परीक्षांचे सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या 'www.mahahsscboard.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात दिले जाणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी त्यानुसार परीक्षेस प्रविष्ट राहावे.
अन्य कोणत्याही संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी सांगितले आहे.
इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. तर, दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली आहे.
बारावी आणि दहावीच्या
परीक्षेचे अंतिम वेळापत्रक :
परीक्षा : कालावधी
- बारावी (सर्वसाधारण, द्विलक्षी, व्यवसाय अभ्यासक्रम) : लेखी
परीक्षा - ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५
- बारावी (प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन, तसेच एनएसक्यूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा)
: २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५
- दहावी : लेखी परीक्षा- २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५
- दहावी (प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा) : ३ ते २० फेब्रुवारी २०२५.
Post a Comment
0 Comments