*_लोकशाही जनजागृती दिंडीस जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा झेंडा_*
नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे - जिल्हाधिकारी अनिल पाटील
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. नवमतदारांनी मतदान तर करायचेच आहे शिवाय त्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना देखील मतदानासाठी प्रवृत्त करावायचे आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी आज येथे केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप उपक्रमातंर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून कणकवली शहरात आज कणकवली नगर पालिका आणि कणकवली कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही दिंडी, रॅली, पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे , मुख्याधिकारी गौरी पाटील, गट विकास अधिकारी अनिल चव्हाण उपस्थित होते.
श्री पाटील म्हणाले, मतदान हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा मुलभूत अधिकारी असून मतदानाचा हक्क बजावणे हे आपले कर्तव्य आहे. जिल्ह्यातील महिला, युवा, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने मतदान करुन या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग व्हावे. तसेच मतदान हा आपला सर्वांचे मूलभुत अधिकार असून ते आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याने सर्वांनी आपले हे कर्तव्य अवश्य बजावावे. नागरिकांना मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकशाही दिंडी व रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना प्रतिज्ञा देण्यात आली. मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. तसेच स्वाक्षरी फलकावर मान्यवरांनी स्वाक्षरी केली.
या रॅलीत नागरिक, विद्यार्थी यांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणार, समानतेचे हे मूल्य बळकट करु या, लोकशाहीत आपल्या सहभागाचा ठसा उमटवूया, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मतदान हा आपला मूलभूत अधिकार आहे, मतदान हे आपले आद्यकर्तव्य आहे. हक्क बजावून कर्तव्य करा आदि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संघटना, विद्यार्थी यांनी मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.
Post a Comment
0 Comments