मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानाच्या दिवशी मुद्रीत माध्यमात दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणिकरण बंधनकारक - जिल्हाधिकारी
प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या किमान २ दिवस अगोदर करावा लागणार अर्ज
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी येत्या २० नोव्हेंबर, २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या एक दिवस अगोदर (१९ नोव्हेंबर) व मतदानाच्या दिवशी (२० नोव्हेंबर) मुद्रीत माध्यमातून राजकीय पक्ष व उमेदवारांच्या राजकीय जाहिराती जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणन समितीकडून पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. अशा जाहिरातींसाठी प्रकाशनाच्या प्रस्तावित तारखेच्या २ दिवस अगोदर समितीकडे अर्ज करावा लागणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे.
मतदानाच्या दिवशी (२० नाव्हेंबर) व मतदानाच्या एक दिवसापूर्वी (१९ नोव्हेंबर) प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये, याबाबत दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी प्रिंट मिडियामध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या २ (दोन) दिवस आधी जिल्हा माहिती कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, सी ब्लॉक, पहिला मजला, ओरोस, सिंधदुर्गनगरी येथे कार्यरत असलेल्या जिल्हास्तरीय माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समितीकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वरील निर्देशाचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, संबंधित संस्था व व्यक्ती यांनी याची नोंद घ्यावी. तसेच प्रिंट मिडीयानेही या दिवशी प्रसिध्दी होणाऱ्या जाहिराती पूर्व प्रमाणीकरण समितीकडून प्रमाणित केल्याची खात्री करुन घ्यावी, असेही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments