कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होण्यासाठी २३ प्रवासी संघटना एकवटल्या
मुंबई
नवप्रभात NEWS
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण होण्यासाठी २३ कोकण रेल्वे प्रवासी संघटना एकवटलेल्या आहेत. त्यामुळे विलिनीकरणासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली.
कोकणातून जाणारी रेल्वे अद्याप भारतीय रेल्वेत विलीन करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांना प्रवासीभिमुख सेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यासाठी निधीची कमतरता भासते. या विरोधात अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कोकण रेल्वेच्या स्थानकांची दुरवस्था झाली आहे. राज्य सरकारने कोकण रेल्वेच्या स्थानकाबाहेरील परिसराचे नूतनीकरण केले असून स्थानकांतील अंतर्गत परिसर भकास आहे. भारतीय रेल्वेतील स्थानकांसाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यात येत आहे. त्यात कोकण रेल्वे मार्गावरील फक्त दोनच स्थानके म्हणजे उडुपी आणि मडगावचे सुशोभीकरण करण्यात आले; मात्र महाराष्ट्रातील कोकण रेल्वेच्या एकाही स्थानकाचा त्यात समावेश नाही तसेच अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेसाठी २ लाख ६२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; मात्र यापैकी कोकण रेल्वेसाठी फक्त १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याने प्रवासी सुविधा वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. दुहेरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक स्थानकांचे टर्मिनसमध्ये रूपांतर करणे व इतर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करावे, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.
Post a Comment
0 Comments