Type Here to Get Search Results !

टाटा समूहाची धुरा नोएल टाटा यांच्या खांद्यावर; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

टाटा समूहाची धुरा नोएल टाटा यांच्या खांद्यावर; टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड

          मुंबई
नवप्रभात NEWS 

टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबरला रात्री निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेणारा व्यक्ती कोण असेल, हा प्रश्नही या निमित्ताने देशवासीय आणि टाटा समूहात उत्पन्न होणे सहाजिक होते. टाटा समूहातील विविध कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा  यांची निवड करून टाटा समूहाने रतन टाटा यांचा वारसदार निवडला आहे. टाटा ट्रस्टच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
     रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने जागतिक भरारी घेतली, शिवाय टाटा समूहाने स्थापनेपासून जी सामाजिक मूल्ये जपली ती रतन टाटांच्या काळात अधिक दृढ झाली. त्यामुळे नोएल टाटा यांच्यावर रतन टाटांचा वारसा पुढे नेण्याचे फार मोठे आव्हान असणार आहे.

रतन टाटा होते अविवाहित 
रतन टाटा यांनी लग्न केलेले नव्हते, तसेच 'टाटा ट्रस्ट'मध्ये त्यांचा वारसदार कोण असला पाहिजे, याबद्दल त्यांनी ट्रस्टला काही पूर्वकल्पना दिलेली नाही. रतन टाटा यांचा वारसदार कोण असेल याबद्दल काही तजवीज केली आहे का याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही.

नोएल टाटा यांची उत्तुंग कामगिरी 
नोएल टाटा २०१४पासून टाटा समूहाच्या ट्रेंट या फॅशन रिटेल कंपनीचे अध्यक्ष आहेत . गेल्या काही वर्षांत ट्रेंटचा शेअर ६००० टक्केंनी वाढला आहे. ट्रेंटचे देशातील स्टोअर आणि कर्मचारी यांची संख्या सातत्याने वाढलेली आहे. सर दोराबजी आणि सर रतन टाटा ट्रस्ट या संस्थांवर ते विश्वस्त आहेत.
       टाटा समूहातील प्रमुख कंपनी असलेल्या 'टायटन'चे ते उपाध्यक्ष आहेत. तसेच ते २०२२पासून टाटा स्टील या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत. २०१० ते २०२१ या काळात त्यांनी टाटा इंटरनॅशनलची जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय टाटा समूहातील इतर काही कंपन्यामध्ये ते संचालक आहेत. त्यांची मुले माया, नेव्हिल, लिह या टाटा कुटुंबाशी संबंधित सामाजिक संस्थावर विश्वस्त आहेत. नोएल टाटा यांच्याबरोबरीने या पदासाठी मेहली टाटा, डॅरिअस खंबाटा, विजय सिंघ, वेणू श्रीनिवासन यांची नावे चर्चेत होती.

Post a Comment

0 Comments