Type Here to Get Search Results !

कुडाळ तालुक्यातील नारुर परिसरात ढगफुटी; शेतकर्‍यांचे नुकसान

नारुर परिसरात ढगफुटी; शेतकर्‍यांचे नुकसान

   मनोज देसाई 
नवप्रभात NEWS 


कुडाळ तालुक्यातील रंगणागडाच्या पायथ्याशी वसलेल्या नारुर गावात काल ढगफुटी होऊन मोठा पूर आला. नदीचे पाणी नदीपात्रातून बाहेर आल्याने नदीलगतच्या परिसरात पाणी शिरले. यात महालक्ष्मी मंदिर परिसरात पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. तसेच नदीलगतच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. 
गुरुवार सायंकाळी 4 वा. सुमारास ही ढगफुटी झाली. महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव होता. त्यामुळे मंदिर परिसरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुराचे पाणी मंदिर परिसरात आल्याने एकच गोंधळ उडाला. 
याबाबत अधिक माहिती अशी की, रांगणागड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. नारुर हा गाव रांगणागडाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे डोंगर भागात पाऊस झाला की, येथील नदीला पूर येतो. मात्र, काल जो पूर आला होता तो महाभयंकर होता. मागच्या काही वर्षांत एवढे पाणी आले नव्हते असे येथील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. गुरुवारी सायंकाळी नारुर परिसरात आणि रांगणागड परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने नारुरमधून वाहणार्‍या गड नदीला मोठा पूर आला. नदी दुथडी भरून वाहू लागली. काही वेळाने नदीेने आपली पातळी ओलांडली आणि पाणी वाट मिळेल त्या दिशेने वाहू लागले. महालक्ष्मी मंदिर हे नदीलगत असल्याने या पुराच्या पाण्याचा फटका काल मंदिर परिसराला बसला. मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. गुरुवार देवीचा वार्षिक गोंधळही होता. त्यानिमित्त भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात होते. मात्र, अचानक पाणी आपल्याने भाविकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले. 
दरम्यान, थोड्यावेळाने पाऊस कमी झाला आणि पाण्याचा वेगही कमी झाला. मात्र, नदीलगतच्या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत. गेल्या तीन महिन्यात तीन ते चार वेळा या परिसरात ढगफुटीसारखा पाऊस कोसळून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तरी तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सरकारने करावेत, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments