शिरोडा वेळागरवासीयांचा ताज प्रकल्पाच्या पायाभरणीला विरोध कायम
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया होऊन शिरोडा वेळागर येथील स्थानिकांचे संबंधित क्षेत्र ताज प्रकल्पातून वगळले जात नाही तोपर्यंत पायाभरणीस आमचा विरोध कायम असेल असे अन्यायग्रस्त वेळागरवासीयांकडून जाहीर करण्यात आले आहे
गेल्या अनेक वर्षांपासून शिरोडा वेळागर येथील प्रस्तावित ताज प्रकल्पाला संपादित करण्यात आलेल्या जमिनीपैकी स्थानिक लोकांची संबंधित क्षेत्र वगळण्यात यावे याकरिता तेथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता अनेक प्रकारे आंदोलने करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.
या मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर हे आम्हा शेतकऱ्यांच्या हितापेक्षा कंपनीचे हित पाहत असून ते आमच्यावर एक प्रकारे अन्याय करत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
शासनाकडून कोणत्याही प्रकारे कायदेशीर बाबींची पूर्तता करून अद्याप पर्यंत संबंधित क्षेत्र वगळलेले नसताना देखील दीपक केसरकर हे आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमची दिशाभूल करत असल्याचा आरोप वेळागरवासीयांनी केलेला आहे.
दीपक केसरकर यांना खरोखरच आम्हाला न्याय द्यायचा असता तर त्यांनी तो मागील दहा वर्षात का दिला नाही असा सवाल देखील या नागरिकांनी उपस्थित केलेला आहे.
त्यामुळे दीपक केसरकर यांच्या शब्दावर आमचा विश्वास नसल्याने दीपक केसरकर यांनी मनमानी कारभार करून स्वतःच्या स्वार्थासाठी ताज प्रकल्पाच्या पायाभरणीचा अट्टाहास केल्यास दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील वेळागरवासीयांनी दिलेला आहे.
वेळागरवासीयांना कोणीतरी भडकवत आहे हे दीपक केसरकर यांचे म्हणणे चुकीचे आहे. वेळागरचा संघर्ष हा वेळागरवासीयांच्या जीवनाचा प्रश्न आहे हे लहान मुलांना देखील समजते पण केसरकर यांना अजून का कळत नाही असा सवाल ही तेथील अन्यायग्रस्त जनतेने उपस्थित केला आहे.
उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले पत्र हे तात्पुरते आहे. तसेच एमटीडीसी कडून अद्यापरी कोणतेही कायदेशीर पत्र प्राप्त झालेली नाही व ताज प्रकल्प संपूर्ण एकच असताना पार्ट 1 व पार्ट 2 असे सांगून केसरकर जनतेची दिशाभूल करत आहेत असेही येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सांगून केसरकर यांच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
वेळागरवासीयांना धुडकावून शेतकऱ्यांवर अन्याय करण्याच्या पवित्र्यात असलेल्या दीपक केसरकर यांना साईबाबा कधी माफ करणार नाही अशाही संतप्त प्रतिक्रिया येथील लोकांनी बोलून दाखविल्या आहेत.
शिरोडा वेळागर येथील सर्वे नंबर 39 व 9 हेक्टर हे क्षेत्र वगळण्याबाबत शासनाचे कायदेशीर आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील असे अन्यायग्रस्त वेळागर वासियांनी म्हटले आहे.
वेळागर आंदोलनाचे नेते जयप्रकाश चमणकर, अध्यक्ष राजेंद्र अंदुर्लेकर, अजू अमरे,बाबा नाईक, हनुमंत गवंडी यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी या प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांना निवेदन देखील सादर केलेले आहे.
Post a Comment
0 Comments