नारुर महालक्ष्मी मंदिराजवळ भक्तनिवास उभारणार आमदार वैभव नाईक यांचे आश्वासन
9 लाख रुपये खर्चून बांधलेल्या शौचालयाचे लोकार्पण
ग्रामस्थांनी केले समाधान व्यक्त
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील नारुर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात भाविकांची स्वच्छतागृहाअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार आमदार वैभव नाईक यांनी या कामासाठी तातडीने स्थानिक विकास निधीतून पावणे नऊ लाखांचा उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर या निधीतून बांधलेल्या सुसज्ज अशा शौचालयाचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या शौचालयाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना मंदिर परिसरात लवकरच भक्त निवास उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महालक्ष्मी देवस्थान समिती नारुर, चार बारा मानकरी, बहुमानकरी, नारुर ग्रामस्थ तसेच नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
नारुर येथील श्री महालक्ष्मी मंदिर सर्वत्र प्रसिद्ध असून दरदिवशी देवीच्या दर्शनासाठी दूरवरून भक्त येत असतात. मात्र या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याने अनेकदा भाविकांची खास करून महिला भाविकांची कुचंबणा होत होती. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याशी नारुर ग्रामस्थांनी चर्चा केली असता भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तातडीने या ठिकाणी शौचालय बांधण्याची ग्वाही दिली आणि स्थानिक विकास निधीतून पावणे नऊ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. या ठिकाणी सुसज्ज असे स्वच्छतागृह बांधण्यात आले असून महालक्ष्मी देवस्थान समिती नारुर, चार बारा मानकरी, बहुमानकरी, नारुर ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले. या कामासोबत मंदिर परिसरात आमदार यांच्या निधीतून पेव्हर्स आणि हायमास्ट दिवेही बसवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
यावेळी बोलताना आमदार नाईक यांनी सर्वप्रथम आई महालक्ष्मीला वंदन करून देवीच्या आशीर्वादामुळेच अशी समाजोपयोगी कामे मार्गी लागत आहेत. देवी महालक्ष्मीचे मंदिर हे संपूर्ण जिल्ह्यासह गोवा, बेळगाव, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाहून दरदिवशी अनेक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. मात्र, एवढा दूरचा प्रवास केल्यानंतर त्यांना मंदिर परिसरात स्वच्छतागृहाची सोय नसल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. विशेषत: महिला भाविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही बाब येथील ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून नारुर गावात यापूर्वी सुद्धा अनेक विकासकामे झाली आहेत. यात महालक्ष्मी मंदिर ते रांगणागड पायथा इथपर्यंत जाणार्या रस्त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच मुख्यरस्ता ते लाखेरे येथे जाण्यासाठी नदीवर पूल उभारला, त्यानंतर मुख्यरस्ता ते जीवानशेळ येथे जाणार्या रस्त्याचे डांबरीकरण, मुख्यरस्ता ते रामलिंग येथे जाणारा रस्ता डांबरीकरण, समतानगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण, सरनोबतवाडी येथील चव्हाण यांच्याघराजवळ बोअरवेल आणि काॅजवे अशी कामे पूर्ण केली आहेत. तर देऊळवाडी येथील लिंगेश्वर मंदिराजवळ बोअरवेलसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
दरम्यान, महालक्ष्मी मंदिर हे पर्यटन क क्षेत्रात येत असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे या ठिकाणी येणार्या भाविकांची संख्या वाढणार असून दूरवरून येणार्या भाविकांसाठी मंदिराजवळ भक्त निवास उभारले जाईल, असे आश्वासन आमदार नाईक यांनी यावेळी दिले.
शेवटी महालक्ष्मी देवस्थान समिती नारूर, चार बारा मानकरी, बहुमानकरी, नारूर ग्रामस्थ आणि नारुर ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्यावतीने आमदार नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments