भातशेतीचे मोठे नुकसान
नुकसान भरपाईची मागणी
नदीलगत संरक्षक भिंत उभारावी
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
परतीच्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून कहर केला आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावांना अधिक फटका बसला आहे. यात नारुर गावाचही समावेश आहे. मंगळवारी सायंकाळी नारुर परिसरात ढगफुटी झाली आणि नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला. पुराचे पाणी भात शेतीत शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी मधुकर तेरसे यांचे मोठे नुकसान झाले असून महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत यांनी पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी त्याचबरोबर संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाला मंगळवार पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी रांगणा गड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. यामुळे नारुर गावातून वाहणाऱ्या गड नदीला पूर आला असून नदी लगतच्या भातशेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतात गाळा साचल्याने शेतकऱ्यांच्या
हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल विभाग, कृषी विभाग व ग्रामपंचायत यांनी यांनी तातडीने याची पाहणी करून पंचनामे करावेत. आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
गेल्या जुलै महिन्यात सुद्धा अशाच प्रकारे ढगफुटी होऊन नारुर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथील समतानगर मध्ये जाणारा रस्ता तीन दिवस पाण्याखाली होता. यावेळी सुद्धा या पुलावरून पाणी गेले. तसेच गोडाऊन जवळील पुलावर देखील मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता.
दरम्यान, नारुर ग्रामपंचायतीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वे सुरू केला आहे. मात्र अवघ्या दोन महिन्यांत दोन वेळा नुकसान झाल्याने शासनाने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
संरक्षक भिंत उभारावी
डोंगर उतारावरून वाहणारी गड नदी नारुर गावाच्या मध्यभागातून वाहत असून या नदीच्या लगत अनेक शेतकऱ्यांची शेती असून दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. तरी ग्रामपंचायतीने दखल घेऊन आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत उभारावी अशी मागणी केली जात आहे.
Post a Comment
0 Comments