योगेश तांडेल / नवप्रभात NEWS
सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज तडकाफडकी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अनिल पाटील नवे जिल्हाधिकारी असणार आहेत. तावडे यांची कारकीर्द अवघी वर्षाभराची ठरली.
राजकोट किल्ला येथे शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे सिंधुदुर्ग जिल्हा सध्या चर्चेत आहे. या विषयावरून मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यरोपही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांच्या बदलीचे आदेश राज्य शासनाने जारी केले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महापालिका आयुक्त पदावर बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी श्री. तावडे ऑगस्ट २०२३ मध्ये रुजू झाले होते. तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डिसेंबरमध्ये साजरा झाला होता. त्यांनी यापूर्वी जिल्ह्यात काम केल्याने जिल्ह्याचा अभ्यास करून त्यांचे कामकाज सुरू होते. सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता; परंतु पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर समाधानी नव्हते. याबाबत मंत्री चव्हाण यांनी जाहीरपणे वक्तव्ये केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी तावडे यांची बदली होणार असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार आज शासनाने जिल्हाधिकारी तावडे यांची बदली केली आहे. जिल्हाधिकारी तावडे यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी हापकिन्स जीव औषध निर्माण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावर कार्यरत असलेल्या श्री. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments