मत्स्यदुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने त्याअनुषंगाने अनुदान मिळणेबाबत वेंगुर्ले मूठ मच्छीमार सहकारी संस्थेचे वेंगुर्ले तहसीलदार यांना निवेदन
योगेश तांडेल
नवप्रभात NEWS
मत्स्यदुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने त्याअनुषंगाने अनुदान मिळणेबाबत वेंगुर्ले मूठ मच्छीमार सहकारी संस्थेने वेंगुर्ले तहसीलदार यांच्यासह मत्स्य विभागाला देखील लेखी निवेदन सादर केले आहे.
सादर केलेल्या निवेदनात मुठ मच्छीमार सहकारी संस्था, मुठ उभादांडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या संस्थेमधील सर्व सभासद आपणास विनंती करतो की,आम्ही मच्छीमार मुठ उभादांडा येथे मासेमारीचा व्यवसाय करुन आमचा उदरनिर्वाह चालवितो. समुद्रात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांमध्ये छोटे व थव्याने मिळणारे विविध प्रकारचे मासे आमच्या सारख्या पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना तारत असतात. परंतू यंदा पावसाच्या तुफानी वाऱ्यामुळे तशी स्थिती असल्याने मस्त्य हंगाम पूर्ण नष्ट झालेला आहे. त्यामुळे आम्हांला मासेमारी करता आलेली नाही. तसेच सतत होणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे आम्ही मच्छीमार मासेमारी करु शकलो नाही. ऐन हंगामाच्या वेळी मासेमारी पूर्ण क्षमतेने झालेली नसल्याने आम्हांला मासेमारीस मुकावे लागलेले आहे.
आम्ही उभादांडा येथे राहणारे मच्छीमार हे पारंपारीक मच्छिमार आहोत. सततच्या वातावरणातील बदलांमुळे व वादळी वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगत मासे न आल्याने माहे ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यांमध्ये मिळणाऱ्या मासेमारीच्या तुलनेत यावर्षी केवळ ५% मासेमारी झालेली आहे. आजची सरासरी पाहता असता गेली तीन वर्षे आम्ही पारंपारिक मच्छीमार पुर्णपणे मेटाकुटीला आलेलो आहोत. पूर्वी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत जास्त क्षमतेने १००% मासेमारी व्हायची परंतू गेली तीन वर्षे तसेच चालु वर्षी देखील या महिन्यांमध्ये पारंपारिक मासेमारी ही केवळ ५% क्षमतेने झालेली आहे. त्यामुळे आम्हा मच्छीमारांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटास सामोरे जावे लागलेले असून आम्हांवर उपासमारीची वेळ देखील उद्भवणारी आहे. सदरची परिस्थिती यापुढेही अशीच सुरु राहील्यास आम्हा सर्व पारंपारिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांस उपासमारीच्या भयंकर संकटास सामोरे जावे लागणारे आहे व परिणामी आम्हा मच्छीमारांना व आमचे कुटुंबासही आत्महत्या करण्यावाचून कोणताही पर्याय राहणार नाही.
मस्त्य व्यवसायाचा सुरुवातीचा काळ हा पारंपारिक पध्दतीने मासेमारी करण्याचा महत्वाचा काळ असतो. कारण काहीशा वादळी हवामानामुळे मोठ्या (हाय स्पौड / एलईडी) ट्रॉल्सची मासेमारी पूर्ण क्षमतेने सुरु नाही. त्यामुळे आमच्या सारख्या पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मासेमारी करण्यास चांगली मोकळीक मिळते. परंतू गेली तीन वर्षाच्या व यंदाच्या मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून वादळी हवामानामुळे आम्हां मच्छिमारांचे मासेमारीचे दिवस आणि तास खूपच घटले आहेत. त्यामुळे ऐन सुगीच्या हंगामात आम्हा मच्छिमारांच्या रोजगाराच्या संधी हिरावल्या गेल्या आहेत. परिणामी आर्थिक संकट आलेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, देवगड, मालवण येथील शेकडो मच्छीमार बांधव समुद्रात मासे नसल्याने मच्छिमारी होत नाही या कारणाने चिंताग्रस्त झालेले आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर १ ऑगस्टपासून यांत्रिकी मासेमारीस प्रारंभ झालेला आहे. आम्हांला दिलेल्या माहितीनुसार मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासूनच मत्स्य विभागाकडून आम्हांला समुद्रातील खराब हवामानाबाबत खवरदारीच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच पत्रांद्वारे पत्रव्यवहार करुन खराब हवामानामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरीता जाऊ नये असे आवाहन देखील केलेले होते. याच वादळी हवामान संदेश पत्रांच्या आधारावर शासनाने कोकणातील मच्छीमारांना पूर्ण क्षमतेने मच्छीमारी करता न आल्याने याच शीर्षकाखाली सानुग्रह अनुदान मंजूर करावे व आम्हां मच्छिमारांना सहकार्य करावे जेणेकरुन येणाऱ्या संकटास सामोरे जाण्यास आम्हांला बळ येईल असे म्हटले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांच्यासह श्यामसुंदर रेवणकर, वाल्मीक कुबल, युवराज गिरप, भानुदास आरांवदेकर ,किरण तांडेल, तेजस बांदेकर मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments