नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानची बीएसएनएलच्या कार्यालयावर धडक
- मोबाईल टॉवर सुरू करण्यासाठी सादर केले निवेदन; सहा महिन्यांत टॉॅवर सुरू करण्याचे अधिकार्यांचे आश्वासन
नवप्रभात NEWS / कुडाळ
कुडाळ तालुक्यातील नारुर गावात गेल्या दोन वर्षांपूर्वी बीएसएनएलने उभारलेला मोबाईल टॉवर अद्यापही सुरू न झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थी, कामगार वर्गासह सरकारी कामातही अडथळे निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे बीएसएनएलच्या सावंतवाडी कार्यालयातील विभागीय अभियंता प्रकाश गंगावती यांना निवेदन सादर करण्यात आले असून येत्या पाच ते सहा महिन्यात टॉवर कार्यान्वित करू, असे आश्वासन यावेळी गंगावती यांनी नारुर ग्रामस्थांना दिले.
नारुर गावात मोबाईल टॉवर असून सुद्धा गेल्या दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थांना नेटवर्कचा सामना करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काल सावंताडी येथील बीएसएनएलच्या कार्यालयात नारुर ग्रामस्थांनी धडक देऊन विभागीय अभियंता यांना निवेदन सादर केले. यावेळी अभित सरनोबत, नंदकिशोर सरनोबत, एकनाथ सरनोबत, सागर परब उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, गावात टॉवर असून सुद्धा नारुर येथील ग्रामस्थांना नेटवर्कसाठी दुसर्या गावात जावे लागत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ही समस्या आहे. मात्र, दोन वर्षांपूर्वी बीएसएनएलने नारुर येथे टॉवर उभारल्याने येथील ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, दोन वर्षे पूर्ण झाली तरी अद्यापही हा टॉवर सुरू झालेला नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहे. नेटवर्क मिळत नसल्याने फोन लागत नाहीत. किंवा ऑनलाइन कामे करताना अडथळे निर्माण होत आहेत. शाळकरी मुलांनाही अभ्यास करताना किंवा शाळेचे ऑनलाइन वर्गात सहभागी होताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच ग्रामपंचायत, शाळा, पोस्ट कार्यालय आणि रेशन धान्य दुकान यांचीही ऑनलाइन कामे पूर्ण करताना अडचणी निर्माण होत आहेत. येथील टॉवर सुरू व्हावा यासाठी याआधी वर्तमानपत्र, सोशल मीडिया यावर प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तरीही याची दखल घेतली गेली नसल्याने काल नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडी बीएसएनएलच्या कार्यालयात जाऊन विभागीय अभियंता प्रकाश गंगावती यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी त्यांनी येत्या पाच ते सहा महिन्यांत नारुर येथील टॉवर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील टॉवर सुरू होईल, अशी अशा निर्माण झाली आहे.
दरम्यान, जर अधिकार्यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या पाच ते सहा महिन्यात मोबाईल टॉवर सुरू झाला नाही, तर याबाबत सावंतवाडी बीएसएनएलच्या कार्यालयासमोर नारुर ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
Post a Comment
0 Comments