हिंदळेतील ग्रामसेविकेची तात्काळ बदली न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
नवप्रभात NEWS / देवगड
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत असून गेली सहा वर्षे हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे त्यांची पंधरा दिवसांत बदली करावी; अन्यथा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
हिंदळे ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, हिंदळे येथील ग्रामसेविका येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वेळेवर कधीही उपस्थित नसतात. त्यामुळे ग्रामस्थांना घरपत्रक उताऱ्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. ग्रामपंचायतीचे कॅशबुक वेळेवर पूर्ण करीत नाहीत, त्यामुळे काम केलेल्या ठेकेदारांची बिले वेळेवर देता येत नाहीत. त्याचा परिणाम गावातील विकासकामावर होतो. विवाह नोंदणी करण्यास टाळाटाळ करून लोकांची अडवून केली जाते. ठेकेदाराने दिलेल्या बांधकाम कामगारांच्या नव्वद दिवसांच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणार नाही म्हणून सांगितले जाते. त्यामुळे बांधकाम कामगारांना सदर योजनेचा लाभ मिळत नाही. गेली सहा वर्षे या ग्रामसेविकेच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक २९ ऑगस्टच्या ग्रामसभेत झाला. त्यांच्या विरोधात ग्रामसभेत ठरावही घेण्यात आला आहे. संबंधित ग्रामसेविकेची येत्या पंधरा दिवसांत बदली करण्यात यावी. पंधरा दिवसांत बदली करण्यात आली नाही तर हिंदळे येथील ग्रामस्थांकडून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याबाबत ग्रामसभेमध्ये घेण्यात आलेल्या ठरावाची प्रत निवेदनासोबत जोडून या समस्येबाबत देवगड गटविकास अधिकारी यांचेही पत्राद्वारे लक्ष वेधले.
Post a Comment
0 Comments