पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी
नवप्रभात NEWS / देवगड
सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितामध्ये चारजण पोलीस सेवेत.
देवगड एसटी स्टॅण्डमार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार,जि. नांदेड) याच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितामध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास घडली होती.
पोलिसांनी संशयितआरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), सटवा केशव केंद्रे (३२, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड),श्याम बालाजी गिते (३५, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड), शंकर संभाजी गिते (३३, रा. ॐ शिववाटीका हाऊसिंग सोसायटी, बदलापूर (पू), जि. ठाणे), प्रवीण विलास रानडे (३४, मधुबन सिटी, वसई (पू)) हे मंगळवारी सायंकाळी ५.३० वा. च्या सुमारास एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली. कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून 'माझ्यासोबत येतेस का?' तुला वसई फिरवतो', असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते, प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. 'तिला गाडीत घे, नंतर काय ते बघू' असे बोलून पीडित युवतीला गार्डमधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोतीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते, माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते, शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी बुधवारी दुपारी देवगड न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत.
Post a Comment
0 Comments