Type Here to Get Search Results !

सत्यशोधक शिक्षक सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार

सत्यशोधक शिक्षक सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होणार

नवप्रभात NEWS / कणकवली 

शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणाविरोधात २५ सप्टेंबर रोजी किरकोळ रजा घेऊन पालकांसह प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये सत्यशोधक शिक्षक सभा सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे व जिल्हासचिव शंकर जाधव, सहसचिव महेश पेडणेकर यांनी दिली आहे.
याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाने दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयामुळे २० व २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमधील शिक्षकांचे एक पद कायमचे व्यप्तगत होणार आहे. याचा परिणाम केवळ शिक्षकांची पदे कायमची बंद होणार एवढाच नसून शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची अत्यंत हेळसांड होणार आहे. तसेच शाळेत एकच शिक्षक नियमित कार्यरत राहणार असल्याने शालेय कामकाज, व्यवस्थापन, योजनांची अंमलबजावणी इत्यादी बाबींचा त्रास होणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीच्या पलीकडे जाऊन अधिक शिक्षकांची पदे शाळांत निर्माण करण्याची गरज असताना शिक्षकांची पदे कमी केली जात आहेत. त्यामुळे ५ सप्टेंबरच्या शासन निर्णयाबरोबरच त्याचे मूळ १५ मार्च २०२४ चा शासननिर्णय हे दोन्ही निर्णय रद्द करावे या मागण्यांसह शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधात एल्गार पुकारला असून, विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणातून हकालपट्टी करणारे शासन निर्णयाचा निषेध पालकांसह रस्त्यावर उतरून जिल्हास्तरावर निषेध मोर्चाचे नियोजन २५ सप्टेंबर रोजी केले जाणार आहे. त्यामध्ये पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments