नारुर गाव कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर ..
दोन वर्षांनंतरही टाॅवरला उद्घाटनाची प्रतीक्षा; नेटवर्क अभावी नागरिकांचे हाल; प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ तालुक्यातील नारूर गावात दोन वर्षांपूर्वी उभारलेला मोबाईल टॉवर अद्यापही सुरू न झाल्याने नारुरवासीयांना नेटवर्कच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांतून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नेटवर्क नसल्याने नारुर गाव कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आह. तसेच गावातील ग्रामपंचायत, शाळा, पोस्ट कार्यालय यांच्यासह कामगारवर्गाला ऑनलाईन कामे पूर्ण करण्यासाठी दुसर्या गावात जावे लागत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तातडीने येथील टॉवर सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या हातात दिसून येतो तो म्हणजे मोबाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा डिजिटल इंडियाची घोषणा केली आणि सर्वच व्यवहार ऑनलाईन झाले. मात्र, या ऑनलाईनसाठी नेटवर्क असणे गरजेचे आहे याचा विसर सरकारी यंत्रणेला पडला असल्याचे दिसून येत आहे. सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा फटका आज नारुर गावातील ग्रामस्थांना बसत आहे. नारुर गावात बीएसएनलचा टॉवर उभारून दोन वर्षे झाली तरी अद्याप हा टॉवर सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांचे नेटवर्कअभावी हाल होत आहेत. गावात नेटवर्क नसल्याने हा गावा नेहमीच संपर्क क्षेत्राबाहेर आहे. दूरध्वनी करायचा झाल्यास तसेच शाळा, ग्रामपंचायत, पोस्ट ऑफिस, स्वास्त धान्य दुकान तसेच गावातील नागरिकांची ऑनलाईन कामे सुद्धा शेजारच्या गावात जाऊन करावी लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पैशांचा अपव्यय
भारतीय दूरसंचार निगमने गावागावांत मोबाईल टॉवर उभे केले आहेत. मात्र, काही गावांत अजूनही टॉवर सुरू झालेले नाहीत. टाॅवर सुरू न झाल्याने बीएसएनएलच्या ग्राहकांना नेटवर्क नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नारुर गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेला असल्याने या ठिकाणी कोणत्याही टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क मिळत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना बीएसएनएलनचा आधार आहे. मात्र, तरीही बीएसएनएलने याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे अनेकांनी आपली मोबाईल नेटवर्क कंपनी बदलली आहे.
दरम्यान, लाखो रुपये खर्च करून जर टॉवर वेळेत सुरू होणार नसेल तर पैसे वाया का म्हणून घालावेत, असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
नारुर गावात गेल्या दोन वर्षांपासून मोबाईलचा टॉवर उभा आहे. हा टॉवर सुरू झाला असता तर गावातील नागरिकांना त्याचा फायदा झाला असता. मात्र, हा टॉवर सुरू होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसह आमदार, खासदार यांचेही दुर्लक्ष झाले आहे.
ग्रामस्थांमधून नाराजी
गावात टॉवर आहे, पण नेटवर्क नाही यामुळे नारुर ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. तसेच सरकारच्या कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली असूत येथी टॉवर तातडीने सुरू करावा अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कुडाळ तालुक्यात नवीन 8 टॉवर अनेक टॉवर बंद असतानाही 2023 मध्ये पुन्हा एकाद नवीन टॉवर उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 2023 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 103 टॉवरना मंजुरी मिळाली आहे. यात कुडाळ तालुक्यातील 8 टॉवरचा समावेश आहे. नवीन टॉवर मंजूर करण्यापेक्षा ज्या गावात उभारले आहेत, ते टॉवर आधी सुरू करून नंतर बाकीच्या गावात सुरू करा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.
टाॅवर सुरू करण्यासाठी नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे प्रयत्न नारुर गावाच्या विकासासाठी आणि विविध समस्या सोडविण्यासाठी नारुर ग्रामविकास प्रतिष्ठान प्रयत्न करीत आहे. गावात मोबाईल टॉवर आहे मात्र हा टाॅवर सुरू न झाल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन नारुर ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे टाॅवर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Post a Comment
0 Comments