जामसंडे, पडेल येथे १९, २० ला करिअर मेळावा
दीक्षित फाउंडेशन, कुशल अकॅडमीचे आयोजन
नवप्रभात NEWS / देवगड
दीक्षित फाउंडेशन आणि कुशल अकॅडमीतर्फे 'करिअर डेव्हलपमेंट-व्यक्तिमत्त्व व कौशल्य विकास' हा संयुक्त उपक्रम सुरू झाला आहे. दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या विचारामधून, करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची सुरुवात इयत्ता १०वीमध्ये असतानाच होते.
एखादा निष्णात करिअर समुपदेशक यामध्ये विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क न घेता देवगड भागातील इयत्ता १०वीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि त्यांचे पालकांसाठी एक खास 'करिअर मार्गदर्शन मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा जामसंडे व पडेल या दोन ठिकाणी अनुक्रमे १९ व २० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी या प्रतिष्ठित संस्थेने प्रमाणित केलेले करिअर समुपदेशक, वैशाली मणेरकर आणि जयंत मणेरकर यांचे या मेळाव्याला मार्गदर्शन लाभणार आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये भारत, अमेरिका आणि युरोपमध्ये तब्बल २७ वर्षे काम करून आपल्या निवृत्त जीवनात देवगड भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा ध्यास घेऊन आलेल्या मणेरकर दाम्पत्याने गेल्या ६ वर्षांत आपल्या भागातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे आणि मार्गदर्शन दिले आहे.
या मेळाव्यात १०वीनंतर असणारे विविध क्षेत्रांतील करिअरचे पर्याय सांगितले जातील. करिअरच्या अनेक पर्यायांतून एखादा पर्याय निवडण्याच्या पद्धती बद्दलही मार्गदर्शन होईल.
तसेच पालक आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांना उत्तरे देण्यात येतील. आपापल्या शाळेतर्फे विद्यार्थी या मेळाव्यासाठी नोंदणी करू शकतात. या मेळाव्याचा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालक यांनी जरूर लाभ घ्यावा, असे ओवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments