ग्रा. पं. संगणक परिचालकांचे मानधन तात्काळ द्या !
परिचालकांचे सावंतवाडी 'बीडिओं'ना निवेदन
नवप्रभात NEWS / सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील ग्रा.पं. आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी आपल्या दोन महिन्याच्या थकित मानधनाबाबत गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना सोमवारी निवेदन दिले. थकित मानधन तात्काळ मिळावे, अशी मागणी केली. नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ महिन्यांतील मानधन अद्यापही न मिळाल्यामुळे संगणक परिचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ दरम्यान, राज्य संगणक परिचालक संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन केले होते. परंतु, तालुक्यातील संगणक परिचालकांनी या आंदोलनात सहभागी न होता आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांनी ग्रा.पं.मध्ये नियमितपणे हजर राहून काम केले. तरीही या कालावधीचे मानधन अद्याप वितरित केलेले नाही. नोव्हेंबर २०२३ महिन्यातील फक्त १५ दिवसांचे मानधन देण्यात आले असून, उर्वरित १५ दिवसांचे मानधन थकित आहे. गणेशोत्सवात संगणक परिचालकांना थकित मानधन तातडीने दिले जावे, अशी मागणी केलीय. केंद्रचालकांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आर्थिक संकट वाढत चालले असून या समस्येचे त्वरित समाधान करणे आवश्यक आहे. गटविकास अधिकाऱ्यांनी या मागणीवर लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा आहे. निवेदनावर चेतना पालव, विद्या कळंगुटकर, समिक्षा भगत, योगिता सावंत, श्रावणी नाईक, चारुशिला गावडे, सोनाली गावडे, स्नेहल नाईक, अक्षता मुळीक, पौर्णिमा कदम, प्रेमा परब तेजल देसाई आदींच्या सह्या आहेत. वीज वितरण ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका अध्यक्ष संजय लाड यांनी परिचालकाच्या मागण्यांना पाठिबा दिला
Post a Comment
0 Comments