कुडाळ महाविद्यालयाचे बुद्धिबळ स्पर्धेत यश
मनोज देसाई
नवप्रभात NEWS
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाने मुंबई विद्यापीठ कोकण विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत यश मिळविले. स्पर्धेत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील मिळून पंधरा महाविद्यालये सहभागी झाली होती. स. ह. केळकर महाविद्यालय (देवगड) येथे मुंबई विद्यापीठाची कोकण विभागीय बुद्धिबळ स्पर्धा झाली. या संघाची पुढील स्पर्धा चिपळूण येथे होणार आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मयुरेश लक्ष्मण परुळेकर या विद्यार्थ्याने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेत महाविद्यालयातील जीमखाना
विभांगातून मयुरेश परुळेकरसह प्रणव ताम्हणेकर, ऋषिकेश खंदारे, ऑगस्टिन डिसोझा, मुकुंद अपराज, जय वळंजू हे सहा विद्यार्थी सहभागी झाले होते. संत राऊळ महाराज महाविद्यालयाला शिस्तप्रिय संघ म्हणून गौरविण्यात आले.
संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. संतोष चौगुले, तर प्रशिक्षक म्हणून क्रिस्टन रॉड्रिग्ज यांनी काम पाहिले. जीमखाना विभागप्रमुख प्रा. डॉ. एन. पी. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ स्पर्धेत सहभागी झाला होता. क. म. शि. प्र. मंडळाचे सर्व पदाधिकारी, प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे, जीमखानाप्रमुख डॉ. एन. पी. कांबळे, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments